पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये विना परवाना आयोजित केलेल्या सायकलिंग स्पर्धेमुळे उद्योजक व कामगार बंधूचे मोठे नुकसान - MAKH

MAKH

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये विना परवाना आयोजित केलेल्या सायकलिंग स्पर्धेमुळे उद्योजक व कामगार बंधूचे मोठे नुकसान

महोदय,

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी टेकडी ते हुपरी या मुख्य रस्त्यावरील एक बाजूचा रस्ता बंद करून रविवार दिनांक ०८/१२/२०२४ रोजी सकाळी ७ ते १ या वेळेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाची परवानगी न घेता सायकलिंग स्पर्धेचे आयोजन श्री. उदय पाटील, कोल्हापूर यांच्या टीमच्या वतीने आयोजित केली होती.  

सदर स्पर्धेमुळे पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरी व व्यवसायाच्या अनुषंगाने कंपनीमध्ये मान्यवर उद्योजक, कामगार बंधु/भगिनी, माल वाहतूक करणारी ट्रान्सपोर्टची वाहातूक व इतर जाणार्‍या वाहनांना सकाळी एक बाजूचा रस्ता बंद असल्याने झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.

पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरी व व्यवसायाच्या अनुषंगाने जवळपास रोज १ लाखा पेक्षा अधिक लोक ये-जा करीत असतात. कंपनीमध्ये कामासाठी येणार्‍या कामगार बंधू भगिनींना सदरच्या आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे कंपनीमध्ये कामावर वेळेवर पंचिंग करणेकरिता पोहचणे शक्य न झाल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.  

      सदरच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण हा प्रश्न उद्योजकांच्या व कामगारांच्या समोर उपस्थित झालेला आहे.

सायकलिंग स्पर्धा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये विनापरवाना आयोजित केल्याबद्दल व झालेल्या नुकसानीबद्दल आयोजक व त्यांच्या टीमवरती संबंधित कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई व्हावी अशी सर्व उद्योजक, कामगार बंधू भगिनी व असोसिएशनच्या वतीने मा. उप जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे साहेब यांना मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील साहेब, मऔविकास महामंडळ, कोल्हापूर चे मा. प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत आज गुरुवार दिनांक १२/१२/२०२४ रोजी सर्किट हाऊस , कोल्हापूर येथे निवेदन देवून करण्यात आली.  

तसेच  येथून पुढील काळात अशा प्रकारच्या कोणत्याही स्पर्धेस औद्योगिक क्षेत्रामध्ये पोलिस मुख्यालय/मऔवि महामंडळ यांनी परवानगी देवू नये अशी विनंती देखील सर्व उद्योजक, कामगार बंधू भगिनी व असोसिएशनच्या वतीने विनंती करण्यात आली.        

                                                                                                                                                                                              मा. उप जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे साहेब यांनी सांगितले की, ज्या आयोजकांनी सदर स्पेर्धेचे आयोजन संबंधित कार्यालयाची परवानगी न घेता केले आहे त्यांच्यावर संबंधित कार्यालयाकडून विना परवाना  स्पेर्धेचे आयोजन केल्याबद्दल व झालेल्या नुकसानी बद्दल दंडात्मक कारवाई करणेबाबत सूचित करू तसेच औद्योगिक क्षेत्रात येथून पुढील काळात अशा प्रकारच्या कोणत्याही स्पर्धेस परवानगी देवू नये याबाबत सूचना देवू व दखल घेण्यास सांगू असे नमूद केले.